पपई



पपई लागवड:

पपई हे एक लोकप्रिय फळ आहे जे त्याच्या उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. इतर कोणत्याही फळ पिकापेक्षा ते लवकर निघते, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देतात आणि फळांचे उत्पादन प्रति युनिट क्षेत्रफळ जास्त असते. भारतातील पपई लागवडीखालील क्षेत्र 1991-92 मधील 45.2 हजार हेक्टरवरून 2011-12 मध्ये 93 हजार हेक्टरवरून 63% ने वाढले आणि उत्पादन 8 लाख टनांवरून 26 लाख टन झाले. पपईची लागवड मुख्यतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये केली जाते.

पपई हे सतत हिरवे रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलीया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत होते. भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १०,८४८ हे. असून सर्वात जास्त क्षेत्र (३,८८० हे.) बिहार राज्यात आहे. आसाममध्ये २,०४१ हे., मध्य प्रदेशात २,००० हे. आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून १,२३६ हे. क्षेत्र आहे आणि इतर राज्यांत १,४१७ हे. क्षेत्र आहे.

हवामान :

कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. २° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात.

जमीन :

पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.

लागवड :

रोपे लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.

रोपे तयार करणे :

चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ - १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्‌ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-६० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.

Write a comment ...

Write a comment ...